-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

आ.शिंदेंनी केवळ धरणग्रस्तांची नव्हे तर जिल्ह्याची फसवणूक केली; माजी आ. नारायण पाटील यांचा आरोप

 

 

प्रतिनिधी/मच्छिंद्र वाघमारे

 

आमदार संजयमामा शिंदे यांनी केवळ धरणग्रस्तांचीच नव्हे तर संपूर्ण सोलापूर जिल्ह्याची फसवणूक केली, असा घणाघाती आरोप माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी केला आहे. वांगी नं. ३ येथे आयोजित “उजनी पाणी परिषदेच्या” सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात उजनी कलश पुजनाने झाली. वयोवृद्ध धरणग्रस्त शेतकरी राम (अण्णा) देशमुख, चेअरमन गोरखराव भोसले, दादासाहेब भोसले, बबनराव गोडसे, आप्पासाहेब भोसले यांच्या हस्ते कलशाचे पुजन करण्यात आले.

 

 

यावेळी बोलताना मा. आ. पाटील म्हणाले की, उजनी धरणासाठी करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कसदार जमीनी शासनास दिल्या. वसलेली गावे या प्रकल्पासाठी उठवण्यात आली. परंतू प्रकल्पग्रस्तांना विचारात न घेता आज उजनीच्या पाण्याचे नियोजन केले जात आहे. उजनीच्या पाण्याचे संवर्धन व संरक्षण करण्याची जबाबदारी आमदार या नात्याने संजयमामा शिंदे यांच्यावर होती. इंदापूर येथील उपसा सिंचन योजनेस जवळपास संपुर्ण सोलापूर जिल्ह्याने विरोध केला. त्यावेळी शेतकऱ्यांच्या भावना तीव्र होत्या. आमदार संजय शिंदे यांनी शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी जलसंपदा मंत्री यांचेकडून इंदापूर येथील नियोजीत उपसा सिंचन योजना रद्द झाल्याचा आदेश मुंबई येथे जाऊन हाती घेतला व सर्वच प्रसिध्दी माध्यमांना स्वतः हून याबाबत माहिती दिली. हा खोटा आदेश पुरावा म्हणून मिरवत याबाबत आ. शिंदे यांनीच हा सर्व डाव रचला होता. शेतकर्‍यांच्या संतापाच्या भावना थंडावल्या आणि यानंतर आता परत याच योजनेसाठी निधी मंजूर होऊन कामासही सुरुवात झाली. मग आ. संजयमामा शिंदे यांनी रद्द करुन घेतलेल्या आदेशाचे काय झाले.? या प्रश्नाचे उत्तर करमाळा तालुक्यातील धरणग्रस्तांना मिळाले पाहिजे. इतकी मोठी फसवणूक करत असताना आ. शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या भावना पायदळी तुडवून आमदार या पदाला लाजवेल असेच काम केले आहे. असा हल्लाबोल माजी आमदार नारायण पाटील यांनी केला. प्रास्ताविक सूनील तळेकर यांनी केले तर प्रा. डाॅ. संजय चौधरी यांनी उजनीचा इतिहास, वर्तमान व भविष्यकाळ यावर अभ्यासपूर्ण भाषण केले.

 

 

यावेळी आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजी देशमुख, माजी संचालक नवनाथ झोळ, धूळाभाऊ कोकरे, माजी जि.प. सदस्य चंद्रप्रकाश दराडे, पंचायत समिती सभापती अतूल पाटील, माजी सभापती गहिनीनाथ ननवरे, मार्गदर्शक प्रा. अर्जूनराव सरक, तालुकाध्यक्ष प्रा. डाॅ. संजय चौधरी, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, महेंद्र पाटील, रामेश्वर तळेकर, नाना गोडगे, पै. शीवा खरात, मातंग आघाडीचे नेते संजय कदम, स्वीय सहाय्यक सूर्यकांत पाटील, धनंजय घोरपडे, विठ्ठल केकान आदि मान्यवर तसेच धरणग्रस्त शेतकरी उपस्थित होते. या पाणी परिषदेत हजारो धरणग्रस्तांनी उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील यांनी केले तर आभार नानासाहेब गोडगे यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close