प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय शिंदे अद्यापही राष्ट्रवादीत प्रवेश करत नाहीत, याचा राग रोहित पवार यांच्या मनात असून आमदार संजय शिंदे यांच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी त्यांना आदिनाथ पाहिजे आहे. मात्र, त्यांच्या या राजकारणात करमाळ्याचे ऊस उत्पादक, सभासद होरपळून निघत आहेत. यामुळे खऱ्या अर्थाने आज रोहित पवार हेच करमाळा तालुक्यातील जनतेचे “खलनायक” ठरले आहेत. असा गंभीर आरोप बाजार समितीचे माजी संचालक देवानंद बागल यांनी केला आहे.
सत्तेचा गैरवापर करून केवळ १७ कोटी रुपयांची थकबाकी म्हणजेच एनपीए दाखवून आदिनाथ कारखाना लाटण्यासाठी शिखर बँक, राज्यातील सहकार खाते, अधिकारी, दिल्लीतील एनसीडीसी बँक व बागल गटाला हाताशी धरून कारखाना भाडेकराराने घेतला. गेली दोन वर्षापासून स्वतः कायदेशीर अडचण निर्माण करून आदिनाथ वर जास्तीत जास्त कर्ज व कर्जाचे व्याज वाढवून कारखाना बंद पाडायचा. परिणामी शेतकरी अडचणीत आणायचे व आपणच तारणहार आहोत, असा भास आमदार रोहित पवार आपल्या चमच्या मार्फत करमाळा तालुक्यात निर्माण करत आहेत.
दोन वर्षापासून करार रखडल्यामुळे कारखान्यावर व्याजाची रक्कम २५ कोटींनी वाढली आहे. तर दोन वर्षाचे जवळपास १६ कोटी रुपये भाडे बुडले आहे. शिवाय कारखाना सुरू न झाल्यामुळे आदिनाथच्या उस उत्पादक सभासदांना ऊस तोडणी साठी एकरी १० ते १५ हजार रुपये खर्च करावे लागत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपला ऊस पेटवून दिला, या सर्व पापाचे धनी रोहित पवार हेच आहेत.
बागल यांनी उपस्थित केलेले प्रश्न
आदिनाथ कारखान्याचे ३२ हजार सभासदांच्या शेअर्स रकमेवर दरवर्षी लाभांश देणार का.? दिवाळीला सभासदांना मोफत साखर देणार का.? आदिनाथ मधील सर्व कर्मचाऱ्यांचा थकलेला पगार देऊन त्यांना पुन्हा कामावर घेणार का.? आदिनाथ वजन काटा सर्व सभासदांना तपासण्यासाठी उघडा ठेवणार का.? आदिनाथच्या सर्व सभासद, ऊस उत्पादकांचा ऊस गाळप करणार का.? उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अंबालिका प्रमाणे ऊस उत्पादकांना दर देणार का.? या एकाही प्रश्नाचे उत्तर आमदार रोहित पवार यांनी आत्तापर्यंत दिले नाही.
स्वतः गप्प बसायचे व आपल्या दरबारातील गुलामांना बातम्या व प्रसिद्धी देण्याचे काम द्यायचे. तसेच मतदार व सभासदांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम रोहित पवार करत आहेत. करमाळा तालुक्यावर एवढे प्रेम असेल तर रोहित पवारांनी यावर्षी करमाळा तालुक्यातील आदिनाथ कारखान्याचे सभासद असलेल्या ऊस उत्पादकांच्या ऊस गाळपाचे नियोजन का केले नाही.? असाही सवाल त्यांनी शेवटी केला आहे.
देवानंद बागल हे माजी आमदार नारायण पाटील यांचे कट्टर समर्थक असून रश्मी बागल यांचे चुलते आहेत. यामुळे देवानंद बागल यांच्या प्रतिक्रियेला मोठे महत्त्व निर्माण झाले आहे.




