-->
करमाळामहिलाविषयकराजकिय

जागतिक महिला दिनानिमित्त साडे येथे ‘आमदार आपल्या दारी’ उपक्रमाचे आयोजन

 

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या संकल्पनेतून करमाळा विधानसभा मतदारसंघांमध्ये राबविल्या जात असलेल्या “आमदार आपल्या दारी, शासकीय योजना पोहोचतील घरोघरी” या उपक्रमांतर्गत आज दिनांक ०८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साडे येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मनोज राऊत, तालुका कृषी अधिकारी वाकडे, महसूल अव्वल कारकून बी.पी. गायकवाड, पंचायत समिती सदस्य जयाताई जाधव, सरपंच सौ. अनिता पाटील, उपसरपंच सौ. मंगल पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ. अरुणा ढवळे, सौ. कल्याणी मोरे, सौ. सुनीता वरडोळे या ग्रामपंचायत सदस्य बरोबरच सौ. कांता काळे, सौ. कस्तुरबा आवटे, सौ. राही बागल, सौ. गिरीजा सुपे, सौ. मंगल घाडगे या महिलांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला.

 

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शिल्पा कुलकर्णी यांनी केले. उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी युवती तालुका अध्यक्ष सौ. शीतल क्षीरसागर म्हणाल्या की, शरदचंद्रजी पवार साहेब व खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये महिलांना ५० टक्के आरक्षणाची संधी दिलेली आहे. महिलांकडे फक्त आरक्षणाचे माध्यम म्हणून न पाहता प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांना समान दर्जा मिळाला पाहिजे या दृष्टीने पुरुष वर्गाचे सहकार्य अपेक्षित आहे. आज कोणत्याही क्षेत्रामध्ये स्त्री पाठीमागे राहिलेली नाही त्यामुळे स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक न देता त्यांना समानतेची वागणूक देणे गरजेचे आहे हाच खरा जागतिक महिला दिन आहे.

 

 

याप्रसंगी कु. वैष्णवी बेंद्रे म्हणाल्या की, स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल या पुरते मर्यादित न राहता या सीमारेषा पुसून बाहेर पडले पाहिजे.

“माझं सुख माझं सुख

हंड्याझुंबरा टांगलं

माझं दुःख माझं दुख

तळघरात कोंडल”

अशी व्यथा स्त्रियांची आहे. त्यामुळे स्त्रियांनी या चौकटीमध्ये अडकून न राहता बाहेर पडण्याचा सल्ला त्यांनी दिला.

 

 

पंचायत समितीचे गट विकास अधिकारी श्री. मनोज राऊत म्हणाले की, एकाच छताखाली शासनाच्या वेगवेगळ्या योजना घेऊन येण्याचा हा प्रयत्न स्तुत्य आहे. या माध्यमातून गोरगरीब लोकांचे अनेक प्रश्न निकाली लागतात हे अशा शिबिरांचे खूप मोठे यश आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या योजना राबविल्या जातात त्या संदर्भात काही अडचणी असतील तर त्यांनी त्या आज मांडाव्यात त्या सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

 

 

यावेळी तालुका कृषी अधिकारी श्री. वाकडे यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून राबविल्या जात असलेल्या वेगवेगळ्या योजना, त्यांचे निकष व लॉटरी पद्धतीने त्यांचे होणारी सोडत याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सौ. जयाताई जाधव यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार कु. स्नेहल अवचर यांनी मानले. तर सूत्रसंचालन सौ. रुपाली आवटे यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close