प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील नेरले व माढा तालुक्यातील मुंगशी या दोन गावामधील अंतर पाच किलोमीटर आहे. त्यापैकी दोन किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण यापूर्वीच झाले आहे. तर एक किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण अवघ्या दोन दिवसांपूर्वीच झालेले आहे. नवीन व यापूर्वी झालेला डांबरीकरण रस्ता पूर्णपणे उखडला आहे. या दोन गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम अतिशय निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे. तरी या रस्त्याचे काम चांगल्या प्रतीचे व्हावे अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे.
नेरले ते मुंगशी या रस्त्याच्या एक किलोमीटर अंतराचे डांबरीकरण करण्याचे काम चालू असून कार्पेट थर देण्याचे काम दिनांक १५ डिसेंबर व १६ डिसेंबर २०२१ रोजी पुर्ण करण्यात आले आहे. तर आज दिनांक १७ डिसेंबर रोजी हे केलेले काम पूर्ण ऊखडले आहे. या रस्त्याचे २० एम एम जाडी करून काम होणे आवश्यक होते. परंतु, दोन ते तीन एम एम जाडीचे काम केले आहे. या रस्त्यासाठीच्या कामास खडी व डांबर अत्यंत अल्प प्रमाणात वापरल्यामुळे ते काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यापूर्वी नेरले ते मुंगशी रस्ताचे २ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तेही काम असेच निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे दोनच महिन्यात रस्ता पूर्णपणे उखडला आहे. चुकीच्या व निष्कृष्ट झालेल्या रस्त्याचे काम पुन्हा चांगले करावे. अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
कोणत्याही गावासाठी सरकारी निधीतून विकास काम होत असताना ते काम चांगल्या प्रतीचे करून घेण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची असते. कारण हा पैसा आपला असून सामान्य नागरिक हा देशाचा मालक आहे. त्यामुळे या कामाबाबत जिल्हा परिषदेचे अभियंता मनोज देवकर यांना फोनवरून कल्पना दिलेली आहे. त्यांनी उद्या दिनांक १८ रोजी या रस्त्याच्या कामाला भेट देणार असल्याचे सांगितले आहे. हा भारत देश छत्रपती शिवरायांच्या विचाराने तयार केलेल्या राज्यघटनेनुसार चालत असून राज्यघटनेच्या विचाराचे तंतोतंत पालन न झाल्यामुळे रस्त्यांचे बांधकाम पाच वर्ष देखील टिकत नाही. छत्रपती शिवरायांनी अनेक किल्ले, रस्ते, पूल यांचे चारशे वर्षापूर्वी केलेली बांधकामे आजही चांगल्या स्थितीत आहेत. हे या कर्मचाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. हे काम योग्य न केल्यास आम्ही तक्रार देऊन ते काम योग्य करण्यास भाग पाडू.
औदुंबर राजे पाटील माजी सरपंच, नेरले



