केम प्रतिनिधी/संजय जाधव


मावळ तालुक्यातील देहू विठ्ठलवाडी जि. प. प्रा. शाळेतील सहशिक्षक केशव रामा भोसले (रा. ढवळस ता. माढा) यांना देहू येथील अभंग प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा “आदर्श शिक्षक पुरस्कार” जाहीर झाला आहे. किशोर भोसले हे माढा तालुक्यातील रहिवासी असून ते देहू विठ्ठलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून काम करत आहेत.
शिक्षकी पेशा स्वीकारला आणि वाहून घेतलं स्वतः ला विदयार्थी आणि समाजासाठी. खुप साऱ्या कामातून विद्यार्थ्यांच्या जीवनाला पैलू पाडण्याचे काम करत असताना अचानक कोरोणाच्या भयंकर संकटाने ही सेवा खंडीत करण्याचे काम केलं. शिक्षक आणि विद्यार्थी यांची नाळच तुटली. कामाच स्वरूपचं बदललं चेक पोस्ट ड्युटी, कोरोना सर्व्हे, रेशन वाटप एवढं कमी म्हणून की काय हॉस्पिटल ड्युटी पण, परिस्थिती भयावह होती. परंतू, जीवाची पर्वा न करता फक्त ही वेळ पळण्याची नाही तर देशाला एव्हाना समाजाला आपली गरज आहे. याची जाणीव ठेवत सर्व ऑर्डर स्वीकारत सेवेला वाहून घेतलं. त्याकाळात घरी असून घरात नसल्यासारखं वेगळं रहावं लागलं. मुलांना बिलगण तर दूरच, बोलणं पण लांबूनच. घरातील सगळे वातावरण भीतीदायक आणि विचित्र झाल होत. कधी कधी वाटायचं हे सगळं सोडुन गावी जावं पण मनावर कर्तव्याची पकड इतकी घट्ट होती की, असं रणांगण सोडून पळण तर दूरच विचार जरी आला तरी वाईट वाटायचं. देशाला आणि समाजाला आपली गरज आहे फक्त एवढाच विचार मनात घोळत रहायचा.
खुप खुप काम केले, तन-मन-धन अर्पून. बातम्या ऐकायचो, टीव्ही बघायचो, सगळीकडे मृत्यूच थैमान चालू होत. आम्ही शिक्षक प्रत्येक ठिकाणी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून उभे होतो. कधी पोलीसांबरोबर, कधी अंगणवाडी ताईंबरोबर, कधी आशा ताईंबरोबर, कधी डॉक्टरांसोबत तर कधी रेशन दुकानदारांबरोबर कामं केले. तर कधी तलाठी- ग्रामसेवक, फक्तं एक जाणवत होत. सगळे जण आपलं आपलं काम करत होते. पण, फक्तं आम्ही शिक्षक असे होतो जे फक्तं स्वतःची कामं सोडुन सगळी कामे करत होतो. वाईट ह्या गोष्टीच वाटत होतं आमच्या कामाची दखल मीडिया असो, शासन असो, जिकडे तिकडे फक्तं त्यांचेच… असो त्यांचेही योगदान दखलपात्र होतंच ठिक आहे म्हणून आम्ही कामं करण चालूच ठेवलं. त्यातच हॉस्पीटल ड्युटी करताना माझ्यामुळे आमचं सर्व कुटुंब कोरोणा बाधीत झाल. हद्द तेंव्हा झाली जेंव्हा सोशल मीडियावर लोक पोस्ट करायला लागले आम्ही घरी बसून पगार घेतो. पगार बंद करायला पाहिजे. त्यात मीडिया पण त्यांच्या सुरात सूर मिसळू लागली मग वाटलं आपलं काही चुकलं तर नाही ना जीव धोक्यात घालून एवढी कामं केली शाबासकी तर दूरच पण अवहेलना ही..!!!
शाबासकीची अपेक्षाच नव्हती पण ही अवहेलना काळीज चिरत होती. असो म्हणत तसच पुढे सरकत राहिलो. आज ना उद्या कोणीतरी आपल्याला, आपल्या कामाला समजून घेईल या आशेवर. आज तो दिवस उजाडला श्री क्षेत्र देहू मधील अभंग प्रतिष्ठान या संस्थेने या आम्ही केलेल्या कार्याची दखल घेतली. आम्हा सर्व शिक्षकांचा सन्मान आणि केलेल्या कार्याची दखल आणि त्याची पोहोच मिळाली. असं वाटलं जगातला सगळ्यात मोठा सन्मान मिळाला.
जो पर्यंत असे लोक जगात आहेत बाकीच्यांचे सोडा किमान यांच्यासाठी परत परत प्राणांची बाजी लावायला आम्ही तयार आहोत. आपल्या या प्रेरणादायी सन्मानाने आम्ही भारावून गेलो आहोत.
हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, करमाळा माढा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय मामा शिंदे, युवा नेते सागर दोंड, केम केंद्र प्रमुख महेश कांबळे, पत्रकार संजय जाधव, तुकाराम शिंदे सरपंच ढवळस, संतोष अनभुले, काळुखे सर यांनी अभिनंदन केले. त्यांचे केम व ढवळस परिसरातून कौतुक होत आहे.




