केम येथील शेती पंपाचा वीजपुरवठा ८ तास करा; अन्यथा…- ए पी ग्रुप अध्यक्ष अच्युत पाटील
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील शेतकऱ्यांना दिनांक २१ ऑक्टोबर रोजी वीज वितरण कंपनीने कोणतीही पुर्व सुचना न देता मोबाईल वर मेसेज टाकून शेतीचा वीजपुरवठा ८ तासावरून २ तास केला आहे. यामुळे शेतकरयांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. केम येथील ए पी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी अच्युत काका पाटील यांनी वीजपुरवठा ८ तास करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा महावितरणला दिला आहे.
केम येथील शेतीचा वीजपुरवठा कपात केल्यामुळे शेतकऱ्यांना शेती पिकांना पाणी देणे मुश्कील झाले आहे. सध्या २ तासच वीज शेती पंपासाठी दिली जाते. वीज येते तेव्हा रात्री अपरात्री शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. या दोन तासात पिकांना पाणी देऊन होत नाही. त्यामुळे शेतकरी वर्गाची पीके वीज व पाण्याअभावी जळायला लागली आहेत. सध्या ज्वारीची पेरणी सुरू आहे, काहींचे ऊस, तुर असून या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, विजेअभावी पिकांना पाणी देणे शक्य होत नसल्याने पिके जळून चालली आहेत. अगोदरच कोरोना मुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आता वीजे अभावी शेती पिकांचे नुकसान होऊ नये.
गेली दीड वर्षे लॉकडाऊन मुळे सर्वच उद्योगधंदे बंद होती. मात्र, शेती उद्योग अशाही परिस्थितीत चालू ठेवून शेतकऱ्यांनी देशसेवा केली आहे. कारण शेतीमध्ये उत्पादित होणारा सर्वच माल जीवन जगण्याकरिता आवश्यक आहे. तरीही राज्य शासनाकडून वारंवार वीज खंडित करणे व रात्रीचीच वीज देणे म्हणजे चेष्टाच असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे दोन दिवसात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज पुरवठा ८ तास करावा, अन्यथा केम महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडले जाईल. असा इशारा ए पी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील यांनी दिला आहे.
माढा तालुक्यात शेतीपंपासाठी आठ तास वीज पुरवठा आहे. मात्र, करमाळा तालुक्यात शेतीसाठी फक्त दोन तासच वीज दिली जात आहे. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही का ?
– सचिन जाधव
संतप्त शेतकरी



