प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


सोलापुर अहमदनगर राज्यमार्गावरील मांगी ता. करमाळा येथील टोल नाक्याजवळ एका ट्रक चालकाने मोटरसायकलस्वारास पाठीमागून जोराची धडक दिली. यामध्ये देवळाली ता. करमाळा येथील एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना आज रविवार दि.२९ मे रोजी सकाळी ०७:३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव वसंत मारुती शिंदे (वय ३५) असे आहे. वसंत शिंदे याचा भंगार गोळा करण्याचा व्यवसाय असून तो करमाळ्यावरून आपल्या मोटरसायकल क्र. (MH.45.AN.3064) ने जातेगाव च्या दिशेने जात असताना पाठीमागून एक मालट्रक क्र. (TN.52.L.9065) हा आला व पुढे मांगी टोलनाक्याजवळील पुलावर खड्डे असल्याने उभा असलेल्या वसंत मारुती शिंदे यास जोराची धडक दिली. यात वसंत शिंदे याच्या डोक्याला मार लागल्याने तो जागीच ठार झाला.
या अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे. वसंत शिंदे हा वैद समाजाचा असल्याने घटनास्थळी वैद समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. परंतु पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून ट्रक चालकास करमाळा पोलीस स्टेशनला पाठवले. तसेच मयत शिंदे याचे पार्थिव पुढील प्रक्रियेसाठी करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.



