करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील कोंढेज येथे आदलिंग वस्ती वरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान सुरू असलेल्या सेवा समर्पण अभियान अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना वह्यावाटप कार्यक्रम भाजपाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा समर्पण अभियान सुरु असून त्याअंतर्गत आज कोंढेज येथील आदलिंगे वस्तीवरील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले आहे. यापुढेही करमाळा तालुक्यात असे सामाजिक उपक्रम या अभियाना अंतर्गत घेण्यात येणार असल्याची माहिती भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा चे तालुका सरचिटणीस दादासाहेब पाठक यांनी दिली. ते कोंढेज मधील आदलिंग वस्ती येथील प्राथमिक शाळेत बोलत होते. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दूध संस्था चेअरमन चंद्रकांत आदलिंग हे होते.
यावेळी अधिक बोलताना पाठक म्हणाले की, मोदीजींनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा संपूर्ण देशभर तर उमटवला आहेच. परंतु, इतर देशांना हेवा वाटेल असे काम केले आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक कल्याणकारी निर्णय घेण्यात आले. काँग्रेसच्या काळात देश घोटाळे करून बरबटलेला होता. परंतू मोदींच्या काळात कीड रुपी भ्रष्टाचाराला कायमचे दूर ठेवले आहे.
यावेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय पोटे, संजय गांधी निराधार योजनेचे नरेंद्रसिंह ठाकूर, विक्रांत भोसले, किरण चांगण, आप्पासाहेब आरणे, सागर रोंगे, बापूसाहेब जाधव, सोनू रोंगे, शाळेचे मुख्याध्यापक नितिन व्हटकर, शिक्षिका सुनंदा फाटके आदी उपस्थित होते.




