मांगी ग्रामपंचायतीकडून ‘या’ कारणासाठी पाणीपुरवठा बंद; सुजित बागल यांच्याकडून मोफत टँकर सुरू

करमाळा/प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील मौजे मांगी येथे ग्रामपंचायतीकडून घरपट्टी व पाणीपट्टी थकल्याचे कारण पुढे करून ऐन सणासुदीच्या दिवसांत व दुष्काळजन्य परिस्थिती असताना गेल्या चार दिवसापासून गावातील पिण्याच्या पाण्याचा पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.
बैलपोळा या सणाच्या एक दिवस अगोदर पासून मांगी ग्रामपंचायतीने पाणीपुरवठा बंद केला आहे. एकीकडे पावसाळ्याचे तीन महिने होऊन गेले तरी पाऊस पडत नाही तर दुसरीकडे सद्यःस्थितीत मांगी ग्रामपंचायतीच्या तीनही विहिरीमध्ये मुबलक पाणी असताना ग्रामपंचायतीकडून पिण्याच्या पाण्याची कृत्रिम पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
वाया गेलेली खरीप पिके, काही साखर कारखान्याकडून अजूनही थकलेली ऊस बिले, सतत खंडित होत असलेला शेतीपंपाचा विजपुरवठा या समस्यांना सर्वसामान्य शेतकरी तोंड देत असतानाच त्यात भर म्हणून मांगी ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
मांगी ग्रामपंचायतीने मनमानी कारभार सुरू केला असून त्यांनी घरपट्टी व पाणीपट्टीसाठी ग्रामस्थांना वेठीस धरू नये. ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून गावात मोफत पिण्याच्या पाण्याचा एक टँकर सुरू केला आहे. उद्यापासून अजून दोन नवीन पाण्याचे टँकर सुरू करणार आहे.
– सुजित बागल, ग्रामपंचायत सदस्य, मांगी
ग्रामस्थांकडून घरपट्टी व पाणीपट्टी भरण्यासाठी अपेक्षेप्रमाणे सहकार्य होत नाही. गेल्या दोन तीन वर्षापासूनची थकबाकी आहे. तसेच पाणी सोडणाऱ्या कर्मचाऱ्यांची पगार थकित असल्यामुळे अडचण आली होती. परंतु उद्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे.
– सोनाली गायकवाड, सरपंच, मांगी ग्रामपंचायत



