करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सोलापूर येथे चार ४ जुलै रोजी आक्रोश आंदोलन होणार आहे. या आंदोलनात मराठा समाजाने कोणतेही गट तट तसेच राजकीय पक्ष न पाहता फक्त आरक्षण या मुद्द्यावर एकत्र यावे. तसेच करमाळा तालुक्यातील मराठा समाजाने मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. असे आवाहन मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष सचिन काळे यांनी केले आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, आपण सहज बोलतो मराठा आरक्षणाच्या लढाईत कोणताही राजकीय पक्ष किंवा नेते सहभागी होत नाहीत. जर त्यांनी आंदोलनात सहभाग नोंदवला नाही तर त्यांना आपण शंड, पक्षाचे लाचार असे म्हणतो. परंतु आता ४ जूलै रोजी सोलापूर येथे होणाऱ्या मराठा आक्रोश मोर्चासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील साहेब हे संपूर्ण सोलापूर जिल्हाभर बैठका घेत आहेत. तर त्यांनाच आता आपण सहज बोलतोय की, ते राजकारण करत आहेत, ते स्वतःच्या पक्षाचा अजेंडा राबवत आहेत. हे मनाला न पटण्यासारखे असून हे माझे वैयक्तिक मत आहे.
एका बाजूने मराठा नेते हे आपल्या मराठा समाजासाठी काहीच करत नाहीत म्हणायचे तर दुसऱ्या बाजूने त्यांनी आरक्षणाचा लढा उभा केला की, त्यांच्यावर राजकारण करत असल्याचा आरोप करायचा ही दुटप्पी भूमिका चूकीची आहे. आता तरी मराठा समाजाने हे थांबवायला हवे. आपण फक्त मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल तिथे एकत्र यायला हवे. मग त्याठिकाणी कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता येवो किंवा कुठल्याही पक्षाचा सहभाग असो. आपल्या या चुकीच्या भूमिकेमुळे भविष्यात कोणताच राजकीय पक्ष किंवा नेते समाजासाठी पुढे येणार नाहीत. परंतु आपण मात्र वेगवेगळ्या राजकीय पक्षात विभागले जाऊन पुन्हा त्यांच्याच दावणीला बांधले जाऊ हे नक्की.




