करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


काँग्रेसला शह देण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९५१ साली भारतीय जनसंघाची स्थापना केली. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत ते लोकसभेवर निवडून गेले. संसदेत त्यांनी विरोधी पक्षाची राष्ट्रीय लोकशाही आघाडी स्थापन केली. भारतीय राजकारणामध्ये त्यांना मानाचे स्थान आहे. असे मत राज्यशास्त्राचे प्रा. प्रकाश काळे पाटील यांनी संगोबा येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी बलिदान दिनानिमित्त व्यक्त केले. प्रतिमेचे पूजन बोरगाव चे सरपंच विनय ननवरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संगोबा नदीवरील श्रमदानाने घाटाची स्वच्छता मोहीम करण्यात आली.
यावेळी पुढे बोलताना काळे पाटील म्हणाले की, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी १९२२ साली कलकत्ता विद्यापीठातून बीए पदवी प्राप्त केली. कलकत्ता विद्यापीठ सिनेट तसेच १९२७ ला ते बॅरिस्टर झाले. जम्मू – काश्मीरच्या संपूर्ण विलीनीकरणासाठी अभियान सुरु केले. आंदोलनामध्ये प्रत्यक्ष काश्मीरला जाण्याचा त्यांनी निश्चय केला. जम्मू-काश्मीरचे तत्कालीन मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला प्रशासनाने राज्य प्रवेशावर बंदी घातलेली असताना बंदी मोडून त्यांनी जम्मू काश्मीर मध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. अटकेनंतर त्यांचा तुरुंगामध्येच अंत झाला. या प्रश्नावर शेख अब्दुल्ला विरुद्ध बरेच दिवस काहूर माजले होते. ते अल्पकाळासाठी पंडित नेहरू यांच्या मंत्रिमंडळात उद्योग आणि पुरवठा मंत्री ही होते. एक आदर्श राजकारणी म्हणून आजच्या पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा.
यावेळी रेल्वे सल्लागार समिती सदस्य दीपक चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, किसान मोर्चा चे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान, मकाई कारखान्याचे मा. संचालक अमोल पवार, सहकार आघाडी चे अध्यक्ष सचिन चव्हाण, राष्ट्रीय समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष अंगद देवकते, नरेंद्र सिंह ठाकूर, संजय जमदाडे, गणेश वाशिंबेकर, विनोद महानगर, सुरेश भंडारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



