उद्यापासून बोगदा तर २ फेब्रुवारी पासून दहिगाव योजनेतून रब्बी आवर्तन सुरू होणार- आ. संजयमामा शिंदे
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


उजनी प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज ऑनलाइन पद्धतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय मामा भरणे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीमध्ये उजनी प्रकल्पातून रब्बी आवर्तन सुरू करण्याविषयी चर्चा झाली. त्यामध्ये करमाळा माढा विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येणारा भीमा-सीना जोड कालवा (बोगदा) याला उद्या म्हणजे २२ जानेवारी २०२२ पासून १०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आ. संजयमामा शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजना ०२ फेब्रुवारी २०२२ पासून सुरू होईल. तर सीना माढा उपसा सिंचन योजना ०१ मार्च पासून ३० मार्च २०२२ पर्यंत सुरू राहिल.
यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे तसेच खरीप हंगामाचे पाणी मुबलक प्रमाणात तालुक्यातील गावांना मिळाल्यामुळे लोकांकडून अद्याप पाण्याची मागणी होताना दिसत नाही. तरीही रब्बी आवर्तनाचे पाणी आपण वेळेवर सुरू करत असून या पाण्यामुळे उन्हाळी आवर्तनवरील ताण कमी होईल व भूगर्भातील पाणीसाठा टिकून राहण्यास मदत होईल याचा फायदा मतदारसंघातील बागायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर होईल असे ते म्हणाले.



