रावगाव ३३ केव्ही उपकेंद्राच्या रखडलेल्या कामावर शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींचा थेट इशारा

प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील रावगाव येथे उभारण्यात येत असलेल्या ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने परिसरातील शेतकरी, ग्रामस्थ व वीजग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. शेतीसाठी आवश्यक असलेला नियमित व दर्जेदार वीजपुरवठा वेळेवर मिळत नसल्यामुळे पिकांचे नुकसान, पाणीपुरवठ्याच्या अडचणी आणि आर्थिक तोट्याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे.
या गंभीर प्रश्नाची दखल घेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले आहे. शेट्टी यांनी बारामती येथील महावितरणचे मुख्य अभियंता (सीई) पेटकर यांच्याशी थेट दूरध्वनीवर संपर्क साधत रावगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे काम तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.
कामात जाणूनबुजून दिरंगाई होत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करताना राजू शेट्टी म्हणाले की, “जर हे काम तात्काळ पूर्ण झाले नाही, तर मी स्वतः रावगाव येथे येऊन स्वाभिमानी स्टाईलने आंदोलन करेन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
यावर मुख्य अभियंता पेटकर यांनी सदर उपकेंद्राचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही दिली असून आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रावगावसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ठाम भूमिकेमुळे रखडलेल्या विकासकामांबाबत प्रशासनावर दबाव वाढला असून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कधी होणार, याकडे रावगाव परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
रावगाव परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन यापूर्वी अनेक वेळा आंदोलन केले आहे. तसेच आंदोलनाचा इशाराही दिला होता. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्याने अखेर राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधून तक्रार करण्यात आली. त्यानंतर शेट्टी यांनी या कामाची गंभीर दखल घेत प्रशासनाला थेट इशारा दिल्याने हालचालींना वेग आला आहे.
-सुदर्शन शेळके, करमाळा तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.




