करमाळ्यातील शेतकऱ्यांचा आधारवड ठरला बारामती ॲग्रो; शेतकऱ्यांचा विश्वास अबाधित ठेवत सर्वाधिक गाळप
करमाळा तालुक्यातील ३.३५ लाख टन उसाचे गाळप बारामती ॲग्रोकडून; तालुक्यातील कारखाने पिछाडीवर

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)


यंदाचा २०२५-२६ ऊस गाळप हंगाम सुरू होऊन अवघा महिना झाला असताना करमाळा तालुक्यातील ऊस मोठ्या प्रमाणात तालुक्याबाहेरील साखर कारखान्यांकडे गाळपासाठी गेला आहे. तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखाने बंद असल्याने आणि दोन खाजगी कारखान्यांपैकी शिवगिरी ॲग्रो अद्याप पूर्ण क्षमतेने चालू नसल्याने व कमलाभवानी ग्लोबल कार्प कारखाना उशिरा सुरू झाल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांचा भार बारामती ॲग्रोसह तालुक्या बाहेरील कारखान्यांवर पडला आहे.
यामध्ये बारामती ॲग्रो युनिट १ (शेटफळगडे ता. इंदापूर) आणि युनिट ३ (हाळगाव ता. जामखेड) या दोन्ही कारखान्यांनी करमाळा तालुक्यातील सर्वाधिक ऊसाचे गाळप करून तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी खरा आधारवड ठरले आहे.
♦ तालुक्यातील ऊस क्षेत्र व गाळपाचे चित्र ♦
करमाळा कृषी विभागाच्या माहितीनुसार तालुक्यात एकूण ३६,२८३ हेक्टर ऊस क्षेत्र असून सुमारे ३० लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. यापैकी आतापर्यंत ७ लाख मे.टन उसाचे गाळप झाले आहे. या गाळपातील केवळ ६०,००० मे.टन ऊसाचे गाळप हे करमाळा तालुक्यातील साखर कारखान्यांनी केले आहे. तर ६,४०,००० मे.टन ऊसाचे गाळप करमाळा तालुक्याबाहेरील साखर कारखान्यांनी केले आहे. या बाहेरील गाळपामध्ये सर्वाधिक ३,३५,००० मे.टन ऊसाचे गाळप हे बारामती ॲग्रो (यु.१ व यु.३) या कारखान्याने केले आहे.
♦ बाहेरील कारखान्यांकडील उसाचे गाळप (मेट्रिक टनामध्ये)
- बारामती ॲग्रो यु.१ – ३,१४,०००
- बारामती ॲग्रो यु.३ – २१,०००
- अंबालिका शुगर – १,६७,०००
- ओंकार शुगर ग्रुप – ६०,०००
- दौंड शुगर – ५३,०००
♦ करमाळा तालुक्यातील कारखान्यांचे गाळप (मेट्रिक टनामध्ये)
- कमला भवानी ग्लोबल कॉर्प – १,३२,००० (त्यापैकी करमाळा तालुक्यातील ऊस फक्त ४३,०००)
- शिवगिरी ॲग्रो – ४०,०००
बारामती ॲग्रो कारखाना नेहमीच शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र राहिला आहे. त्या विश्वासामुळेच करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला आज पर्यंत जवळपास ३,३५,००० मे. टन ऊस बारामती ॲग्रो यु.१ व यु.३ या दोन्ही कारखान्याकडे गाळपासाठी दिला आहे. यापुढेही भविष्यात करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांवर कधीही अन्याय होऊ देणार नाही. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांचा ऊस बारामती ॲग्रो कारखाना गाळप करणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी घाई न करता आपला ऊस नोंदीप्रमाणे बारामती अग्रो कारखान्याकडे गाळपास द्यावा.
– सुभाष (आबा) गुळवे, उपाध्यक्ष, बारामती ॲग्रो कारखाना.
“करमाळा तालुक्यातील दोन सहकारी कारखान्यांपैकी आदिनाथ सहकारी साखर कारखाना विद्यमान आमदार नारायण आबा पाटील यांच्याकडे, तर मकाई सहकारी साखर कारखाना भाजप मध्ये असलेल्या बागल कुटुंबियांकडे असून हे दोन्ही कारखाने बंदच आहेत.”



