-->
करमाळाराजकिय

तालुक्यातील जनतेने एवढा पळपुटा आमदार कधीही पहिला नाही; पाटील गटाचे प्रवक्ते तळेकर यांची आ. शिंदे यांच्यावर टीका 

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

पाच वर्षात एकदाही आमसभा न घेणारे करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील सर्वात भित्रे आमदार आहेत. शासनाच्या सर्व विभागाचा आढावा प्रत्यक्ष जनतेसमोर घेतला गेला असता तर यातून आपलेच पितळ उघडे पडेल या भीतीपोटी विद्यमान आमदारांनी आमसभा घेण्याचे टाळले असून ही पळपुटेपणाची लक्षणे आहेत. तालुक्यातील जनतेने एवढा पळपुटा आमदार यापूर्वी कधीही पहिला नाही. अशी टीका माजी आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी आमदार शिंदे यांच्यावर केली आहे.

 

याबाबत सविस्तर बोलताना ते म्हणाले की, आमसभा घेणे हे प्रत्येक आमदारांना बंधनकारक आहे. यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि जनता यांचेत समन्वय घडून मतदार संघातील अनेक विकासकामे मार्गी लागतात. आमसभेत झालेल्या ठरावांना विधानसभा कामकाजात महत्व देऊन गांभीर्याने सदर कामे केली जातात. परंतु विद्यमान आमदार संजयमामा शिंदे यांनी जनतेचा आवाज दाबण्याचे काम केले आहे. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचा विषय आमसभेत मंजूर करून घेऊन पुढे गेला असता तर एव्हाना योजनेचे प्रत्यक्षात काम सुरु झाले असते.

 

सन २०१४ ते २०१९ मध्ये एक आमसभा, एक वीज दरबार आणि सात तालुकास्तरिय आढावा बैठका घेण्यात आल्या होत्या. या शिवाय वेगवेगळ्या विषयावर शासकीत विभागाच्या अनेक बैठका घेण्यात आल्या. मागील काळात झालेल्या आमसभेत उजनीच्या पाण्याबाबत काही महत्वाचे ठराव जनतेच्या उपस्थित मंजूर करण्यात आले होते. यामुळे चालू पाच वर्षात आमसभा होणे गरजेचे होते. आमदार संजयमामा शिंदे यांनी याबाबत करमाळा तालुक्यातील जनतेची माफी मागावी.

 

आमदार आपल्या दारी सारखा कार्यक्रम राबविण्यापेक्षा आमसभा (कोरोना कालावधी वगळून) घेतली असती तर यात जनतेने मांडलेल्या विषयावर सरकारने आणि प्रशासनाने गंभीरतेने तोडगा काढला असता व यातील बरेच प्रश्न सुटले असते. महसूल, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग या महत्वाच्या विभागात आज जनतेच्या शेकडो तक्रारी न सोडवता फायलीत बंद आहेत. याला आमसभेमुळे मोकळीक मिळून हे प्रश्न गतीने सुटले असते. यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांनी जनतेचा हा अधिकार व आवाज दाबण्याचे काम केले आहे.

 

आजवरच्या करमाळा तालुक्यातील सर्व आमदारांनी आपल्या कालावधीत आमसभा घेतल्या. मग सन २०१९ ते २०२४ मध्ये अद्याप एकही आमसभा का झाली नाही? याचे उत्तर आ. संजयमामा शिंदे यांनी जनतेला द्यावे. अन्यथा आगामी काळात जनतेसमोर मते मागायला जागा उरणार नाही असा टोलाही तळेकर यांनी लगावला. तसेच विधानसभा अध्यक्ष यांचेकडे करमाळा मतदार संघात आमसभा नाही झाले बाबत पाटील गट लेखी तक्रार नोंदवणार असल्याची माहितीही तळेकर यांनी दिली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close