उद्या दहीगाव उपसा सिंचन योजनेचे खरीप आवर्तन सुरू होणार; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


गेल्या वर्षी करमाळा तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे उजनी धरणात अवघा ६० टक्के पाणीसाठा झाला होता. याच पाणी साठ्यावरती गेल्या वर्षी पाणीपुरवठा झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा -६० टक्के पर्यंत गेला होता. यावर्षीही करमाळा तालुक्यात अद्यापही सर्वसमान पाऊस झालेला नाही. विशेषतः दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या टेल भागात अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू करावे. अशी मागणी आपण यापूर्वीच कार्यकारी संचालक कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्याकडे केली होती. काल जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये पालकमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी सदर पाणी सोडण्यास मान्यता दिली असून उद्या सोमवार दि. ५ ऑगस्ट पासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरू होईल अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, उजनी धरण पाणलोट क्षेत्रांमध्ये सातत्याने संततधार पाऊस सुरू असून उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आह. त्यामुळे दहिगाव उपसा सिंचन योजना तसेच बोगदा यांनाही पाण्याचे आवर्तन उद्यापासून सुरू होणार असून त्याचा फायदा खरीप हंगामातील पिकांसाठी तसेच बारमाही पिकांसाठी शेतकऱ्यांना होणार आहे.
दहिगाव उपसाच्या पट्ट्यात केळी लागवड वाढणार
करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉल पट्ट्यात केळीची लागवड मोठ्या प्रमाणावर होत होती, परंतु गेल्या वर्षी दुष्काळाचा फटका या भागांनाही बसला त्यामुळे केळी बागांची लागवड होऊ शकली नव्हती. यावर्षी मात्र ऑगस्ट मध्येच उजनी धरण १०० टक्के कडे वाटचाल करत असल्यामुळे शेतकऱ्यांची पाण्याची चिंता मिटलेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या पट्ट्यामध्ये केळी लागवड मोठ्या प्रमाणावर होणार आहे.




