
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा शहरा लगत मांगी रस्त्याला लागूनच असलेल्या महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहत अर्थात एम. आय. डी. सी. मधील उद्योगांसाठी असलेल्या प्लाँटचे सद्याचे दर उद्योजकांना न परवडणारे आहेत. त्यामुळे जमिनीच्या प्लाँटचे दर शासनाने प्रति चौरसमीटर १०० ते १५० रूपये एवढे ठेवावेत. जेणेकरून उद्योजकांना दिलासा मिळेल असे प्रतिपादन श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दिग्विजय बागल यांनी आज करमाळा येथे केले.
याबाबत अधिक बोलताना श्री. बागल म्हणाले की, करमाळा शहरालगत मांगी रस्त्याला लागुनच महाराष्ट्र औद्योगिक वसाहत लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल मामा हे आमदार असतांनाच मंजूर करून घेतली होती. करमाळा तालुक्यातील युवक, उद्योजक व बेरोजगारांच्या हाताला या औद्योगिक वसाहतीमुळे (एम.आय.डी.सी) काम मिळेल व तालुक्यातील जनतेला दिलासा मिळेल या भुमिकेतून या एम. आय. डी. सी. ची मंजुरी आणुन ४६ हेक्टर जमीन शासनाने त्याचवेळी अधिग्रहित केली होती.
परंतु एखाद्या उद्योजकाला जर काही उद्योग अथवा कारखाने सुरू करायचे असतील तर एमआयडीसी मधील जमिनीच्या प्लाँटचे दर सद्या ७००/- रुपये प्रति चौरसमीटर इतके आहेत. हे दर खुप जास्त असुन राज्यात कोणत्याही एमआयडीसी मध्ये प्लाँटचे दर एवढे जास्त नाहीत. ही बाब उद्योजकांवर अन्यायकारक आहे. त्यामुळे करमाळा एमआयडीसी मध्ये उद्योग सुरू करण्यासाठी वा स्थापीत करण्यासाठी कंपन्या, कारखानदार तसेच व्यावसायिक पुढे येत नाहीत.
याशिवाय तेथे उद्योगांकरीता शाश्वत पाणी पुरवठ्याची सुविधा नाही. त्यामुळे इच्छा असुनही अनेक उद्योजक याठिकाणी येत नाहीत. पर्यायाने करमाळा शहर व तालुक्याचा विकास थांबलेला आहे. वास्तविक पाहता शासनाने उद्योजकांसाठी केवळ १०० ते १५० रुपये प्रति चौरसमीटर या दराने प्लाँटची विक्री करावी जेणेकरून अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांना निश्चितपणे दिलासा मिळेल. याबाबत लवकरच मुंबई येथे राज्याचे मा. मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब व मा. उद्योगमंत्री यांना समक्ष भेटुन विनंती करणार असल्याचे शेवटी श्री. बागल म्हणाले.




