
माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


राजकीय पदाधिकारी म्हणून काम करत असताना सामाजिक कार्यात नेहमी आघाडीवर राहून हे काम करताना सर्व पक्षातील मित्र मंडळाला बरोबर घेऊन समाजाचे प्रश्न सोडवता येतात. असे मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गटाचे करमाळा तालुकाध्यक्ष भरत अवताडे यांनी व्यक्त केले. करमाळा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुढे बोलताना अवताडे म्हणाले की, माझे सर्व गटातटात मित्र असून मी राजकारण वेगळे आणि मैत्री वेगळी जपत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून तालुक्यात प्रचंड समाजसेवेच जाळ उभे राहिले आहे याचा मला अभिमान आहे. जुनी आठवण सांगताना ते म्हणाले की, माझा अत्यंत गरीब कुटुंबात जन्म झाला. माझे कुटुंब माझ्या लहानपणी गावातील भिक्षेकरी लोकांनी गोळा केलेले पीठ विकत आणून उपजीविका करत होते. लहानपणीच आईचे निधन झाल्यामुळे मी अत्यंत अडचणींवर मात करत एक यशस्वी उद्योजक झालो आहे. माझ्या कंपनीत १०० तरुणांना मी रोजगार दिला असून या पुढील काळात ही माझ्या ठेकेदारी व्यवसायातून प्रत्येकाला बरोबर घेऊन प्रगती करणार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी बोलताना प्रा. अशोक नरसाळे म्हणाले की, माणसाला आयुष्यात असे चार जीवाचे मित्र पाहिजेत की, त्या मित्रांजवळ आपण सगळ्या गोष्टी अडचणी शेअर करू, अन्यथा मानसिक दबा वाढू शकतो. भरत अवताडे यांनी प्रत्येक गटातटात आपले मित्र तयार केले आहेत. यावेळी बोलताना पत्रकार नासिर कबीर म्हणाले की, भरत अवताडे अनेकांना मदत करतात पण त्याचे प्रसिद्धी करत नाहीत.
यावेळी सुभाष अण्णा सावंत गटाचे नेते श्री सुनील बापू सावंत, युवा नेते मानसिंगराव खंडागळे, उद्योगपती दिनेश घोलप, प्रा. अशोक नरसाळे, पत्रकार नासिर कबीर, नागेश शेंडगे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील, जेऊर शहर प्रमुख बाळासाहेब करचे, युवासेना जेऊर शहर प्रमुख महादेव सूर्यवंशी, रंभापुरा शिवसेना शाखाप्रमुख निलेश चव्हाण, आदी पदाधिकारी उपस्थित होते.




