
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यामध्ये 2019 पासून वेगवान गतीने विकास होताना दिसत आहे. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य हे मूलभूत प्रश्न सोडविण्यामध्ये आमदार संजयमामा शिंदे हे यशस्वी झालेले आहेत. त्यामुळे संजयमामा शिंदे यांच्या प्रत्येक नवीन कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न पाटील गटाकडून होत असून पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर नुसत्याच ढगात गोळ्या सोडत आहेत. असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य नानासाहेब नीळ यांनी केला आहे.
याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, सुनील तळेकर यांचा दावा आहे की 2016 मध्ये तत्कालीन आमदार नारायण पाटील यांनी गौंडरे येथील उच्च दाब सबस्टेशन विषयी मागणी केलेली होती. त्यांच्या मागणीनुसारच सध्याच्या सबस्टेशन साठी सर्वेचे आदेश आलेले आहेत. या तळेकरांच्या बोलण्यामध्ये जर तथ्य असेल तर मग पत्र व्यवहारांमध्ये माजी आमदार नारायण पाटील यांच्या पत्राचा उल्लेख का नाही? या प्रश्नाचे उत्तर तळेकर यांनी द्यावं. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अवघ्या 3 वर्षांमध्ये कोविड सारखे संकट असतानाही आमदार संजयमामा शिंदे यांनी मतदारसंघात नवीन 3 सब स्टेशन तसेच 8 एडिशनल ट्रान्सफॉर्मर बसविण्यासाठी परवानगी मिळवली. एवढेच नव्हे तर कोर्टी, पांडे, आवाटी आदी सबस्टेशनचे प्रत्यक्ष कामेही सुरू झाले आहेत. पांडे ॲडिशनल ट्रांसफार्मर कार्यान्वितही झालेले आहे.
2014 ते 19 मध्ये माजी आमदार यांनी किती दिवे लावले, किती प्रकाश पाडला हे सांगत बसण्यापेक्षा वस्तुस्थिती त्यांनी सांगावी. फक्त 5 वर्षांमध्ये 1 सबस्टेशन ते करू शकले ते पण पोमलवाडी वरून आणून लव्हे येथे केले. ते सुद्धा कार्यकाळात त्यांना चालू करता आले नाही. त्यासाठी आमदार संजयमामा शिंदे यांना पाठपुरावा करून रेल्वेची परवानगी घेऊन ते 2020 मध्ये कार्यान्वित करावे लागले हे वास्तव सुनील तळेकर का मान्य करत नाहीत ?
सुनील तळेकर यांनी पत्रव्यवहार पाहावा
आमदार संजयमामा शिंदे यांच्या पत्र व्यवहाराविषयी बोलताना नानासाहेब निळ म्हणाले की, जावक क्र. ए.एन 844/2022 दि. 4 नोव्हेंबर 2022 च्या पत्राद्वारे आमदार संजयमामा शिंदे यांनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे गौंडरे येथे 132/33 नवीन उच्चदाब स्टेशनची मागणी केली होती. या पत्राला अनुसरून जो पत्रव्यवहार झालेला आहे तो पत्र व्यवहार सुनील तळेकर यांनी आवर्जून पहावा. आमदार संजय मामा शिंदे यांच्या पत्रानंतरच महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय यांचे पत्र व्हीआयपी 2023/प्र.क्र.164/ऊर्जा-4, दि. 20 एप्रिल 2023 रोजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित मुंबई यांच्याशी पत्रव्यवहार केला गेला त्याला संदर्भ म्हणून आमदार संजयमामा शिंदे यांचे 4 नोव्हेंबर 2022 चे पत्र जोडले गेले आहे आणि आमदार संजय मामा शिंदे यांच्या संबंधित पत्रानुसार योग्य ती कार्यवाही व्हावी असे स्पष्ट उल्लेख आहेत. या पत्राला अनुसरून महापारेषण जावक क्र. 253, 4/5/2023 रोजी मा. तहसीलदार करमाळा यांना गौंडरे येथील विद्युत उपकेंद्र उभारणीसाठी सरकारी जागा उपलब्ध करून देणे विषयी पत्रव्यवहार केलेला आहे. त्या पत्र व्यवहारांमध्ये महापारेषण कंपनीने तीन संदर्भ दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला संदर्भ आमदार संजय मामा शिंदे यांचे पत्र ए एन. 688/2022 दि. 8 नोव्हेंबर 2022 हा आहे. दुसरा संदर्भ ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय यांचे पत्र व्हीआयपी 2023 /प्र.क्र. 164/ ऊर्जा -4, दि. 20 एप्रिल 2023 हा आहे. तिसरा संदर्भ मा. मुख्य अभियंता अऊदा, प्र.नि.सं व सु, परिमंडळ पुणे यांचा दि. 28 एप्रिल 2023 चा इमेल हे संदर्भ आहेत. त्या सर्व संदर्भीय पत्रामध्ये आमदार संजयमामा शिंदे यांनी केलेल्या मागणीचा स्पष्ट उल्लेख आहे. जर 2016 मध्येच माजी आमदारांनी सदर उच्चदाब सबस्टेशन विषयी मागणी केलेली होती तर मग त्यांच्या पत्राचा उल्लेख यासंबंधीत पत्रामध्ये का नाही ? प्रवक्त्यांनी ढगात गोळ्या आणि हवेत वार करणे बंद करावे हे त्यांच्या आणि गटाच्या तब्येतीसाठी योग्य होईल असा सल्लाही श्री नीळ यांनी दिला आहे.




