एकच निर्धार.! आदिनाथ कारखाना चालूच करणार; शेलगाव(वां) येथील बैठकीत सभासदांचा एल्गार…
शेलगाव वांगी मधून अडीच कोटी रुपयांची ठेवी देण्याची घोषणा!!!

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मंदिर म्हणून ओळखला जाणारा श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखाना उभा करण्यासाठी शेलगाव (वांगी) येथील शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कवडीमोल दिल्या. या कारखान्यात काम करणारे बहुतांश कामगार आमच्या गावातला आहे. आमचा उसाचा प्रश्न आदिनाथ कारखानाच सोडू शकतो, त्यामुळे हा आदिनाथ कारखाना सहकार तत्वावर सुरू झाला पाहिजे. असा एकमुखी ठराव शेलगाव वांगी येथे झालेल्या आजच्या बैठकीत ऊस उत्पादक, सभासदांकडून करण्यात आला. यावेळी ‘एकच निर्धार आदिनाथ चालूच करणार’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
बचाव समितीचे निमंत्रक आदिनाथ कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांच्या उपस्थितीत आज शेलगाव वांगी येथे सायंकाळी बैठक झाली. यावेळी सरपंच अमरराव ठोंबरे, उपसरपंच नवनाथ केकान, आदिनाथचे माजी संचालक संजय खाडे, बप्पा साळुंके, सूर्यकांत केकान, राजू बेरे, दराडे गुरुजी, खाडे सर, रामभाऊ दराडे, सतीश बेरे, प्रभाकर कोरे, खताळ सर, नागनाथ केकान, मार्केट कमिटीचे चेअरमन प्रा. शिवाजीराव बंडगर, प्रा. संजय चौधरी यांच्यासह पंचक्रोशीतील शेकडो ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी आदिनाथ कारखाना सहकार तत्वावर चालू झाला पाहिजे यावर एकमताने चर्चा होऊन शेलगाव (वां) मधून अडीच कोटी रुपयांच्या ठेवी ठेवणाऱ्या सभासदांची यादी जाहीर करण्यात आली. या सर्व ठेवीदारांचे हरिदास डांगे यांनी स्वागत केले. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत प्रत्येक सभासदाने पोटतिडकीने आपले विचार मांडून कसल्याही परिस्थितीत या कारखान्याचे खाजगीकरण होऊ द्यायचे नाही असे मत मांडले. यावेळी बोलताना शेलगाव वांगीचे सरपंच अमरसिंग ठोंबरे म्हणाले की, आदिनाथ कारखाना हा आमच्या शेलगाव वांगी गावाच्या कार्यक्षेत्रात आहे. या कारखान्याचे सर्व संरक्षण हीत जोपासण्याचे प्रामुख्याने काम आमच्या गावकऱ्यांचे आहे. आज हरिदास डांगे यांनी पुढाकार घेतल्यामुळे हा कारखाना पुन्हा जोमाने चालणार हा विश्वास आमच्या मनात निर्माण झालेला आहे.
आता हा कारखाना चालू करण्यासाठी सर्व सभासद एकत्र येत असताना राजकीय मंडळींनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी यामध्ये खोडा घालू नये असे आव्हानही सभासदांनी केले. आदिनाथ सहकारी तत्त्वावर चालू होणार यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून अशाच पद्धतीने गावोगावी बैठका घेणार असल्याचे बचाव समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.




