प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांनी जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे करमाळा मतदारसंघासाठी तब्बल ३० कोटीहून अधिक निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली आहे.
यामध्ये करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या पोफळज, झरे, मोरवड, विहाळ या गावांसाठी १३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून माढा तालुक्यातील सीना माढा उपसा सिंचन योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या टेंभुर्णी, कुर्डू या गावातील भूसंपादनासाठी १६ कोटी ६५ लाख ११ हजार १३७ रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांनी आमदार झाल्यानंतर ३० वर्षापासून रखडलेल्या कुकडी भूसंपादनाच्या विषयावरती तसेच दहिगाव व सीना माढा या उपसा सिंचन योजनांच्या भूसंपादनाच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे तालुक्याला भरघोस निधी प्राप्त झालेला आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी कुकडीसाठी २० कोटी तर दहीगावसाठी ७ कोटी असा एकुण २७ कोटींचा निधी करमाळा मतदार संघातील भूसंपादनाच्या कामासाठी यापूर्वीच मिळविलेला आहे. आ. संजयमामा शिंदे यांच्या या कामामुळे मतदार संघातील शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.




