बिबट्याला पकडण्यासाठी मांगी येथे लावला पिंजरा; नियंत्रण, मदत कक्षाची ही स्थापना

करमाळा/प्रतिनिधी


वन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शनिवार (दि.५) रोजी मांगी (ता. करमाळा) येथे प्रत्यक्ष पाहणी केली व या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे सांगून त्यावर कोणतीही उपाय योजना न करता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. यावेळी उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त करत बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यामुळे नागरिकांच्या मागणीनुसार वन विभागाच्या वतीने मांगी येथे बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला आहे.
मांगी येथे ज्या ठिकाणी बिबट्या दिसला होता तिथे पिंजरा लावण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार हा पिंजरा लावण्यात आला असल्याचे वनविभागाचे वन निरीक्षक एस. आर. कुरले यांनी सांगितले आहे. या पिंजऱ्यात कोंबडी ठेवण्यात आली आहे. तसेच या ठिकाणी पाच जणांची बिबट नियंत्रण माहिती कक्ष स्थापन करण्यात आले आहे. यामध्ये वनमजूर कर्मचारी गणपत जाधव, नारायण चव्हाण, सोमा भोसले, तानाजी खरात व गजानन तोरमल यांचा समावेश करण्यात आला असून वनविभागाचे अधिकारी बाळासाहेब लटके व सुरेश कुरले यांच्या मार्गदर्शनाखाली हा कक्ष कार्यरत आहे.




