
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


दिग्दर्शक प्रवीण तरडे यांचा बहुचर्चित मराठी चित्रपट सरसेनापती हंबीरराव हा आज शुक्रवार दिनांक २७ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमुळे चित्रपट प्रदर्शनाच्या अगोदरच प्रेक्षकांना उत्सुकता लागली होती. आज चित्रपट प्रदर्शित होत असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपटाचा पहावा असे आवाहन सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे व चित्रपटातील कलाकारांनी केलेले आहे.
या चित्रपटामध्ये मांगी ता. करमाळा येथील सर्वसामान्य कुटुंबातील सोमनाथ गणेश जाधव या तरुणाने शिपायाची छोटीशी भूमिका केली आहे. सोमनाथ लहानपणापासून मनात चित्रपटामध्ये काम करण्याची इच्छा बाळगून होता. सोमनाथ सध्या मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी विविध चित्रपट दिग्दर्शकांना भेटून चित्रपटात काम मिळण्याची संधी शोधत असतो.
सोमनाथ जाधव याने विविध चित्रपटात छोट्या मोठया भुमिका केलेल्या आहेत. यापूर्वी अनेक दिग्दर्शकांबरोबर सोमनाथने मोब रोलमध्ये भूमिका केल्या आहेत. मांगी सारख्या छोट्याशा गावातून केवळ जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशाची उंची गाठू शकतात हे सोमनाथ जाधव यांनी दाखवून दिले आहे. यामुळे मांगी गावासह करमाळा तालुक्यामध्ये सोमनाथ जाधव यांचे विशेष कौतुक होत आहे.
या निमीत्त मांगी गावचे युवा नेते व मकाई कारखान्याचे चेअरमन श्री. दिग्विजय बागल, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुजित तात्या बागल, पार्श्वगायक प्रवीणकुमार अवचर, पुणे येथील उद्योजक अशोक नरसाळे यांनी सोमनाथचे विशेष अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




